Monday, September 3, 2012

स्टँड बाय मी...

गेल्या वर्षीची गोष्ट आहे. आमच्या गावात लंडनहून आयात केलेले एक कंडक्टर ( बस चे नाही, पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे) बीथोवन ची पाचवी सिम्फनी (फॅन नाही, धून) वाजवणार होते. बीथोवन ची पाचवी सिम्फनी ही जगातली सर्वप्रसिद्ध (आणि त्यामुळे सगळ्यात जास्त वेळा उचलली गेलेली) रचना आहे. रहमान भक्तांना जर युवराज सिनेमाच्या साऊंडट्रॅक मधला सलमान चा भयंकर मोनोलॉग ( अरेच्चा! ही तर टॉटोलॉजी झाली -  मोनो म्हणजे एक आणि लॉग म्हणजे ओंडका,  आणि सलमानच्या अभिनयाची रेंज बघता त्याला 'एक था ओंडका' असं म्हणायला काही हरकत नसावी..  असो! तर तो भयंकर मोनोलॉग) आठवत असेल तर त्यात मागे जी वाजते तीच बीथोवन ची पाचवी सिम्फनी.

त्यामुळे एवढी प्रसिद्ध रचना जर एखादा ऑर्केस्ट्रा ( आपल्याकडचा नव्हे - पोपटी शर्ट घातलेला माणूस सिंथसाइजर  बडवतोय आणि त्याच्या रथात पुढे 'सांगली की सुनिधी' झेपत नसताना 'शीला की जवानी' गातेय....) आपल्या गावात सादर करणार असेल तर अशी संधी कशाला चुकवा असं म्हणून अस्मादिकांनी कार्यक्रमाचं (अंमळ महाग) तिकीट काढलं.

आठवड्याच्या मध्यात कार्यक्रम असल्याने मी हापिसातून थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. दार उघडून आत गेल्यावर समोर काउंटर वर एक म्हातार्‍या आज्जी तिकीटं तपासत बसल्या होत्या त्यांच्यापाशी जाऊन मी माझं तिकीट दिलं. जशी आज्जींची नजर तिकीटाकडून माझ्याकडे गेली तसा त्यांचा चेहरा पांढराफटक पडला. 'ह्यांना काय झालं आता?'  असा विचार करता करता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. पाश्चात्य शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना जाताना सुटाबुटात जावं असा अलिखित नियम आहे आणि मी मात्र माझ्या ऑफिस च्या अवतारात  ( 'गजनी' पांढरे  शूज, टी शर्ट, जीन्स आणि वर हूडी ) तिथे धडकलो होतो. त्यामुळे माझं तिकीट तपासताना आज्जीनी येशू चा धावा चालवला होता.

अखेरीस मी सभागृहात प्रवेश करून माझ्या आसनावर स्थानापन्न झालो. समोर व्यासपीठावर बहुतांश वादक येऊन बसले होते.

  थोड्या वेळाने पहिल्या ओळीतले वादक आले आणि मग टाळ्यांच्या कडकडाटात कंडक्टर साहेबांनी प्रवेश केला. मग पुढले दोन तास ते वेगवेगळ्या रचना वाजवून घेत होते आणि प्रत्येक रचनेनंतर (आपल्याकडच्या ट्रॅवल्स च्या गाड्यांच्या चालकांसारखे) बाहेर जाऊन चहा पाणी करून परत येत होते. आणि त्यांच्या प्रत्येक एंट्री आणि एक्झिट ला प्रेक्षक उभे राहून टाळ्या पिटत होते.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्या 40-45 वादकांच्या ताफ्याने ती पाचवी सिम्फनी सादर केली आणि माझ्या कानांचं ( आणि डोळ्यांचं ) पारणं फिटलं. काही ठिकाणी तर असं वाटत होतं की उठून जोरात  'ब्राव्हो!' असं ओरडावं . पण पुन्हा त्यांच्या नियमावलीत सादरीकरण चालू असताना दाद देणं हे असंसकृतपणाचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे इतरांसारखाच मी सुद्धा मान हलवून चोरटी दाद देत होतो.

मला राहून राहून आठवत होती ती वसंतोत्सवातली गुलाम अलींची मैफल. 'वो तेरा कंगन घुमाssssना याद है' मधल्या 'घुमाना' वर त्यांनी सुरांचा असा काही खेळ केला होता की त्याला दाद द्यायला गझल संपेपर्यंत थांबणं हा त्या गझलेचा, ती लिहिणार्‍या हसरत मोहानींचा आणि खुद्द गुलाम अलींचा अपमान ठरला असता.

जसा कार्यक्रम संपला तसे प्रेक्षक ( श्रोते ) उभे राहून टाळ्या पिटू लागले. हे 15 मिनिटं चाललं. मधल्या काळात आपल्या नावाला जागत कंडक्टर साहेब 2-3 दा बाहेर जाऊन पान तंबाखू करून परत आले. अखेरीस 'हे असलं कडक इस्त्रीच्या कपड्यात नाजून साजून दाद देणं आपलं काम नाही गड्या' असं स्वत:शी म्हणत मी बाहेर पडलो.

बाहेर येऊन बघतो तर समोर फुटपाथावर दोनेक पुरूष आणि 5-6 मुलं असा एक ब्यांड ड्रम्स आणि सॅक्सोफोन वर गाणी वाजवण्यात गुंग झाला होता. त्यांना समोर कोण आहे आणि कोण नाही, कोण उभं राहून दाद देतंय आणि कोण बसून राहिलंय यातल्या कशाचीच फिकीर पडली नव्हती.


मी त्यांच्याइथे पोहोचायला आणि त्यांनी बेन किंग चं 'स्टँड बाय मी '  वाजवायला एकच गाठ पडली. नकळत माझ्या पायांनी ताल धरला. कुठला ही बडेजाव न करता आणि बिना माईक चे ते सगळे रंगून गाणं वाजवत होते. त्यांचा तो उस्फूर्त आविष्कार बघून इतका वेळ रोखून धरलेला माझा श्वास मोकळा झाला.

आजूबाजूला पाहिलं तर माझ्यासारख्या अनेकांची तीच अवस्था झाली होती. नकळत टाय च्या गाठी सुटत होत्या, कोट अंगातून निघून खांद्यावर लटकत होते, पाय ताल धरत होते आणि हात टाळी पिटत साथ देत होते.मला त्या क्षणी तिथे आणण्यासाठी कारणीभूत असलेल्या बीथोवन चे आभार मानत मी  'Darling Darling Stand.... By Me'  गुणगुणत घरी परतलो.

1 comment:

Anonymous said...

I have always felt there is a raw energy and an imperfection in street performers that is very endearing and far more appealing than their polished on-stage counterparts. You must have heard the guy outside the boat that take you to the Statue of Liberty..
Well written blog and a triumphant return to the scene. Look forward to this being a weekly feature as before. Long live the King!