Monday, June 27, 2011

प्रिय

प्रिय,

हो आणि नाही च्या मध्ये हिंदकळत असताना तुला पत्र लिहायला बसलो खरं, पण त्या अवस्थेचा आवेग ओसरल्यावर आणि त्या अस्वस्थतेचा दाह शमन झाल्यावर ’लिहिण्यासारखं काही राहिलंच नाहीये की काय’ अशी एक शंका मनाला चाटून गेलीये. अर्थात माझं अस्तित्वच आता शंकास्पद झाल्यावर अन माझ्या असण्या आणि नसण्यालाच वास्तवाच्या कसोटीवर घासायची गरज पडल्यावर, माझ्या शंकांना इतरच काय, पण मी तरी किती महत्त्व देणारेय कुणास ठावूक!

अर्थात ही अवस्था अशी तशी प्राप्त होत नाही. त्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात, आणि मुख्य म्हणजे तुझ्या ’जगाला फ़ाट्यावर मारण्याच्या’ स्टेज ला पोहोचावं लागतं. मग कुठे आपलीच ओळख आपल्याला पहिल्यांदा होते. म्हणजे आजूबाजूच्या लोकांच्या नजरांकडे दुर्लक्ष करून स्वत:च स्वत:कडे बघावं लागतं. मग अशावेळी जे दिसेल ते चांगलं असेलच असा हट्ट न धरलेलाच बरा. एरवी, ’इतरांच्या नजरेत आपण’ या रियालिटी टीव्ही शो-सारख्या अष्टौप्रहर चालणार्‍या कार्यक्रमातले आपण कलाकार. त्यातून बाहेर पडणं जर धर्मराज युधिष्ठिराला जमलं नाही तर आपण तर ’धर्म म्हणजे काय?’ असं विचारणारे पापी.

असो. अशा दुर्लभ अवस्थेत पोचल्यावर सरळ निद्रादेवीची आराधना करायची सोडून जर तुला पत्र लिहिण्याचा आचरटपणा करायला घेतलाच आहे, तर तो पूर्णविरामापर्यंत पोहोचवलेला बरा.

प्रिय, शाळेत जर अवघड कविता आवडल्या नाहीत तर मग आता र ला र आणि ट ला ट वाल्या कविता का आवडत नाहीत? थोडंसं जरी मीटर चुकलं तर रावसाहेब होवून ’गल्ली चुकलं काय वो हे पी यल?’ असं स्वत:ला विचारावसं का वाटतं? त्याहून महत्त्वाचं असं की, का जी मुलं मराठीच्या तासाला मुलींची ’त़सली’ (सार्वजनिक ठिकाणी कुठले ही ’बूर्झ्वा’ विचारसरणीला अस्वस्थ करणारे ( असं काहीतरी बरळण्यासाठी मराठीची पुस्तकं वाचावी लागतात हो! फ़क्त अभ्यासाची पुस्तकं वाचून पुरत नाही) शब्द वापरायचे नाहीत हा संकेत मोडवत नाही, अगदी या अवस्थेत सुद्धा) चित्रं बघायची, ती कॉलेजात गेल्यावर कविता करू लागली आणि व. पु. वाचू लागली हे नवलच नाही का? की याला सुद्धा फ़्रॉईड ने काहीतरी नाव देऊन ठेवलंय? (जे काही अति-जाणकार त्यांच्या लेखावरच्या अभिप्रायांमध्ये आमच्या तोंडावर मारणार आहेत?)

अर्थात फ़्रॉईड आठवला कारण त्याच्यावरच्या एक सिनेमाची झलक आम्ही काही तासांपूर्वीच पाहिली. अन्यथा आमची सलगी फ़्राईड राईस शी च जास्त. असो. निदान ’मनाच्या अवस्थेचा अन खराब विनोद मारण्याचा काही संबंध नाही’ हा तरी निष्कर्ष निघाला. अर्थात तो व्यक्तिसापेक्ष जास्त आहे. अन्यथा आमच्या एका हिरडीबहाद्दर मित्राने ते कधीच सिद्ध करून दाखवलंय.

प्रिय, बिफ़ोर सनराईज मध्ये नायक म्हणतो की, ’जर पुनर्जन्म नावाची गोष्ट खरी असेल, तर मग पृथ्वीची लोकसंख्या कशी वाढतीये? हे नवीन जीव जन्माला कुठून येताहेत? किंवा मग असं असेल का की आपण मेल्यानंतर आपल्या आत्म्याचे अनेक तुकडे होत असतील आणि ते पुन्हा जन्माला येत असतील? आणि मग हेच कारण आहे का की ज्यामुळे आपण उभं आयुष्य अधुरं असण्याच्या भावनेत घालवतो? त्या दुसर्‍या तुकड्याच्या शोधात जो आपल्यापासून विलग झाला आह?’

हॉलिवूड वाले लोकं शुद्ध बिनडोक आहेत. जी कल्पना त्यांनी एका सिनेमात एक संवाद म्हणून वापरली त्यावर यश चोप्राने एक आख्खा सिनेमा काढला (’के कोई हैं जो मेरे लिये बनाया गया हैं’ वगैरे वगैरे शेण). खरंच त्यांनी गॉडफ़ादर काढण्याच्या आधी जरा रामू शी चर्चा करायला हवी होती. रामू म्हणजे, राजेंद्र क्षिरसागरचा जो मित्र आहे ना, तो! त्याने एका गॉडफ़ादरच्या प्रसंगावर चार सिनेमे बनवून दिले असते. ते ही कमी खर्चात आणि वीजबचत करून. त्याला असंही बिन दाढीच्या कलाकारांचे अंधारात क्लोज अप घ्यायची सवय आहे. त्यामुळे ’इंडियाना जोन्स’ ला टक्कर देणारी ’मायकल कॉर्लिओनीज ऍडव्हेंचर्स’ नावाची मालिका काढून दिली असती त्याने.

असो. जसं मटका खेळणार्‍यांना वाण्याच्या बिलातही ’आकडे’ दिसतात तसेच आम्हाला साक्षात्कारी आणि आयुष्य बदलण्याची क्षमता असणार्‍या प्रसंगांमध्ये सिनेमे सुचतात.

तर प्रिय, तू काहीही म्हण. म्हणजे तू काहीतरी म्हणावंस म्हणूनच हे पत्र लिहायला घेतलं होतं. पण आता असं वाटू लागलंय की मी बोलण्याच्या पलिकडे गेलोय. म्हणजे काय ते मला नाही माहीत. पण बाहेर होणारी सकाळ ही त्या आतल्या उजेडाने झालीये असं काहीतरी...

नेहमीप्रमाणे, तुला कळेलंच मी काय बोलतोय ते. आणि नाहीच कळलं तर सोडून दे. माझं मला तरी कुठे कळलंय....