Saturday, March 26, 2011

शेवटची कविता

बर्‍याच दिवसांपासून लिहिण्यासाठी काही सुचत नव्हतं. मग सुचलं तेव्हा वेळ नव्हता. अखेर बरेच ग्रह तारे एका रेषेत येउन आजचा दिवस (रात्र) उजाडला.

या पोस्ट ला माझ्या ब्लॉगच्या संदर्भात बर्‍याच बाबतीत ’पहिलं’ असण्याचा मान मिळाला आहे.

श्रद्धा भोवड नावाच्या माझ्या अत्यंत आवडत्या ब्लॉगलेखिकेने मी ’मला कुणी खो च देत नाही’ म्हणून गळा काढल्यानंतर दया येउन मावसबोलीतली कविता लिहिण्याचा खो दिला. असा खो कुणी मला देण्याची आणि मी तो घेण्याची ही पहिलीच वेळ.

कुठल्याही एका भाषेवर असायला हवी तितकी मजबूत पकड नसल्याने आपण करतो तो अनुवाद म्हणजे मध्यम आकलनाकडून मध्यम शब्दरचनेकडे असा त्या कवितेचा प्रवास असतो हे लक्षात आल्यानंतरही हट्टाने अनुवादित केलेली ही पहिलीच कविता.

या वर्षातला हा माझा पहिलाच लेख.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला या वाढदिवसाला एक अतिशय सुंदर जर्नल (डायरी म्हणत नाहीए कारण त्यात तारखा वगैरे नाहीएत) आणि एक दुर्मिळ पेन भेट मिळालं. त्या जर्नलवरती लिहिलेली ही पहिलीच कविता.
कवितेकडे जाण्याआधी थोडंस त्या ऑसम जर्नलबद्दल (मला या शब्दावरून एकदम जर्नेलसिंग भिंद्रनवाले ची आठवण झाली). ’द ग्रेट गॅट्स्बी’ ही माझी एक अत्यंत आवडती कादंबरी. या जर्नलच्या मुखपृष्ठावर एफ़. स्कॉट फ़िट्झ्जेराल्ड या त्या कादंबरीच्या लेखकाची स्वाक्षरी आणि कादंबरीच्या मॅन्युस्क्रिप्ट चं त्याच्या हस्ताक्षरातं पहिलं पान छापलंय. त्याच्या बारीक अक्षरामुळे आणि अक्षरांच्या आणि मुखपृष्ठाच्या रंगसंगतीमुळे लांबून पाहिलं की ’हे अलिफ़ लैला किंवा अशाच कुठल्या तरी अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारिक कथांचं पुस्तक आहे की काय’ असा भास होतो.

आता थोडं कवी आणि कवितेबद्दल. रॉबर्ट डेस्नॉस या फ़्रेंच Surrealist कवीच्या ’Le dernier poème' (The Last Poem) या फ़्रेंच कवितेचा इंग्रजी अनुवाद नुकताच वाचनात आला. प्रेम आणि दु:ख या माझ्या दोन आवडत्या विषयांवरची ही छोटीशी कविता मला खूपच भावून गेली. म्हणून तिच्या मराठी अनुवादाचा हा प्रयत्न. मूळ कवितेला न्याय देता आला नाही तरी निदान या माध्यमातून दोन चार लोकांची या सुंदर कवितेशी ओळख तरी व्हावी हा त्यामागचा उद्देश.

मूळ फ़्रेंच कविता

Le Dernier poème

J’ai rêvé tellement fort de toi,
J’ai tellement marché, tellement parlé,
Tellement aimé ton ombre,
Qu’il ne me reste plus rien de toi.

Il me reste d’être l’ombre parmi les ombres
D’être cent fois plus ombre que l’ombre
D’être l’ombre qui viendra et reviendra
dans ta vie ensoleillée.


इंग्रजी अनुवाद

I have dreamed so much of you,
Walked so often, talked so often with you,
Loved your shadow so much.
Nothing is left me of you.
Nothing is left of me but a shadow among shadows,
A being a hundred times more shadowy than a shadow,
A shadowy being who comes, and comes again, in your sunlit life.


मराठी अनुवाद

मी तुझी अगणित स्वप्नं पाहिली

तुझ्यासह आणि तुझ्याबद्दल
कितीकदा चाललो, कितीकदा बोललो,

तुझ्या छायेवर इतकं प्रेम केलं
की आता तुझा अंशही माझ्यात उरला नाहीए,

माझंही अस्तित्त्व आता अगणित छायांपैकी
एक बनून गेलंय,

छायेपेक्षाही अंधुक, अस्थिर आणि असहाय्य,

अशी छाया जी हळूच कधीतरी
सोनकिरणांनी उजळल्या तुझ्या आयुष्यात डोकावते...

*****************************************

कवितेचा सगळ्यात थक्क करून सोडणारा भाग म्हणजे ती डेस्नॉस ने १९४५ साली तेरेझिनाच्या छळ छावणी मध्ये असताना लिहिली होती. हा संदर्भ या प्रेमकवितेला एक वेगळाच अर्थ देऊन जातो. नाही का?