Sunday, July 25, 2010

द मावसबोली इफ़ेक्ट

लोकहो, गेल्या काही दिवसांमध्ये मराठी ब्लॉगविश्वात ज्या काही घडामोडी घडून आलेल्या आहेत त्यांबद्दल बोलल्याशिवाय चैन पडणार नाही हे ठावूक असल्याने त्यांचा वृत्तांत येथे देत आहोत.

आषाढी एकादशीपासून महाराष्ट्रात पावसाने आणि मराठी ब्लॉगविश्वात संवेदने (शाब्दिक खोखो बहाद्दर!) सुरू केलेल्या खो खोच्या खेळाने जोर धरला आहे. गेले कित्येक दिवस शांतावलेल्या मुलुखमैदान तोफ़ा (गायत्री, श्रद्धा इ.) पुन्हा या निमित्ताने गर्जू लागल्या आहेत.

वा वा वा, काय वर्णन करावं त्या खेळाचं! एकेक कविता अशी जमून आलीये की खो देणार्‍याचं कौतुक करावं की घेणार्‍याचं हेच कळू नये!

इतक्या विविध भाषांमधली ( रशियन, फ़्रेंच, जर्मन इ.) काव्यसंपदा इतक्या सुंदर पद्धतीने मराठीत अनुवादित आणि ती ही इतक्या कमी दिवसांच्या कालावधित पहिल्यांदाच होत असावी.

अजून काही ज्येष्ठ खेळाडू मैदानात उतरले नाहीयेत ( ट्युलिप, प्रसाद इ.). पण सामना रंगलेला आहे हे नक्की.

रसिकहो, कृपया पुढील कवि कवयित्रींच्या ब्लॉग्जवर जाउन त्यांनी अनुवादित केलेल्या कविता नक्की वाचा.

संवेद, मेघना, गायत्री, श्रद्धा, राज, सई, मंदार.


- महाराष्ट्रीय साक्षरता मिशन तर्फ़े रसिकहितार्थ जाहीर

ता. क. मित्रांनो, कवयित्रींच्या View My Complete Profile वरती जाउन त्यांची मौलिक माहिती मिळवण्यावरती समाधान न मानता त्यांनी अनुवादलेल्या कविता सुद्धा न विसरता वाचा ही माझी तुम्हांस नम्र विनंती.

ता. ता.क. अस्मादिकांच्या शब्दयष्टी आणि शरीरयष्टीस ध्यानात घेता या मैदानी खेळाचे आमंत्रण मिळालेले नाही (आणि विनाआमंत्रण भाग घेण्यास अत्यादिक आळस आड येतो) यात आश्चर्य ते कसले?