Saturday, April 3, 2010

प्रिय

प्रिये,

उत्तररात्रीला नुकतीच सुरवात झालीये (प्रारंभ झालाय म्हण हवं तर!).

या देशात चंद्र केवढा मोठ्ठा दिसतो. आज तर काय सुंदर दिसत होता म्हणून सांगू? म्हणजे तू असतीस ना तर नक्की स्वप्नाळू डोळ्यांनी त्याच्याकडे एकटक बघत काहीतरी बोलली असतीस (आता काय ते तुलाच ठावूक. मी काय बापडा सांगणार?) आणि मग मी मात्र भान हरपून तुझ्याकडे बघत बसलो असतो -अगदी तू स्वत:ची तंद्री मोडून मला झापेपर्यंत.

हं. मग म्हणली असतीस, ’पुरी झाल्या चंद्र आणि चांदण्यांच्या गप्पा! सूर्योदय कसा असतो हे लक्षात तरी आहे का? निशाचर मेला!’. आणि मग मी दिलखुलास (म्हण आता सातमजली) हसून मस्तपैकी रात्री जागण्याचा गुन्हा कबूल करीत तुला एकाच वेळी निरूत्तर आणि नि:शस्त्र केलं असतं.

मग स्वत:हून उठून स्वयंपाकघरात जाउन कॉफ़ीचे दोन वाफ़ाळते कप आणून एक माझ्या हातात दिल्यावर बारीक आवाजात ’आज जाने की जिद ना करो’ लावलं असतंस.

किंवा

माझ्या पारंपारिक पुरूषी रोमॅंटिक कल्पनांना सुरूंग लावत स्वत:च ’ए प्लीज जरा कॉफ़ी करतोस का रे?’ असं बारीक तोंडाने म्हणून मलाच स्वयंपाकघरात पिटाळलं असतंस.

मग मीही कॉफ़ी आणल्यावर बदला घेण्यासाठी क्ष-व्यांदा तुला कॉलेजात असताना रौनक च्या शेजारच्या गादी कारखान्याच्या पायर्‍यांवर बसून आम्ही लोक कसे कॉफ़ी पित गप्पा मारायचो (आणि तिथेक एके रात्री कसा माझ्या लाडक्या मित्राचा वाढदिवस साजरा केला होता) ही ष्टोरी सांगितली असती. पण तूही हं हं करत कधी बरोबर आणि बर्‍याचदा चुकीच्या जागांना दाद देत हातातलं पुस्तक वाचत राहिली असतीस.

प्रिये, रात्र सरत चालली आहे.
मग अशीच रात्र सरता सरता आपल्या गप्पा रंगल्या असत्या. मग पुस्तकं, सिनेमे, कॉलेज, मित्र, मैत्रिणी असं सगळं सगळं बोलता बोलता मी नकळत नॉस्टॅल्जिक झालो असतो.

मग उगीच मला काहीबाही दिसलं असतं. आई, बाबा, बहिण, तो पुण्यातला रस्ता, त्याच्याशेजारचा फ़ुटपाथ, गणपतीचं मंदिर, बंद दुकानाचं शटर, त्याबाहेरच्या पायर्‍या, रस्त्याशेजारची बाकडी, ती शाळेला न जाणारी पोरं, ती शाळेला जाणारी पोरं, ती म्हातारी,ती कोतारी, ती कॉलेजासमोरची वस्ती, ती पहिल्या वर्षी कधी कधी तुडवलेली चिखलवाट, ते मित्राबरोबर बसून शिक्षणावरच्या खर्चाचे हिशोब मांडणं, ते त्याचं स्वत:चा कॉंप्युटर पॅक करून माझ्या कॉंप्युटरवर सिनेमे पाहणं, त्या मित्रांसोबतच्या गप्पा, त्या चर्चा, ते गॉसिपिंग, ते न सुटणारे प्रश्न, ती अगतिकता, तो आनंद, ते दु:ख..

मग अशीच रात्र गहिरी होत गेली असती. तू मुकेपणाने माझ्याकडे पहात राहिली असतीस.

आणि मी मात्र अगदी एकटा एकटा होऊन गेलो असतो

अगदी एकटा एकटा

आत्ता आहे तसा.

प्रिये, पहाट कधी होईल?