Thursday, November 5, 2009

प्रिय

प्रिये, आता हे नविनच होत चाललंय बघ! म्हणजे जुनंच पण नव्याने.

म्हणजे गतायुष्यातले क्षण आठवणं काही वाईट नाही. त्यांना सरधोपटपणे ’चांगले’ असं लेबल लावणं देखील तसं नॉर्मलच! पण ते आठवल्यावर ’हे आत्ता आहे ते सारं देऊन परत तिथे जाता आलं तर जाशील?’ ला ’हो’ म्हणून उत्तर देताना जराही थबकलो नाही. ज्याची स्वप्नं रंगवण्यासाठी कल्पनेचे रंगही अपुरे पडले असते असा भविष्यकाळ चक्क जगत असताना एवढी विरक्ती आली कुठून?

शाळा आठवली. दरवर्षी वरच्या वर्गात गेल्यावर काही दिवसांनी मधल्या सुट्टीत आदल्या वर्षीच्या वर्गात गेल्यावर न चुकता एकदाही काही ओळखीचं वाटलं नाही. तो विशिष्ट पद्धतीने फ़ुटलेला फ़ळा, त्याच्या लगेच वरच्या भिंतीचे निघालेले पापुद्रे आणि त्यामुळे तयार झालेली नक्षी, तिच्यावर कोणे एके काळी इंस्पेक्शन साठी रंगवलेले दोन हात आणि ’सुस्वागतम’, नेहमी बसण्याचा बेंच, त्यावर इयत्तेप्रमाणे काढलेली ग्राफ़िटी, तिच्यात अस्मादिकांनी घातलेली भर, खिडकी, खिडकीतून दिसणारी बाग, रस्ता, भेळेची गाडी, दुसरी खिडकी, भिंत, अंधार.. काही काही ओळखीचं वाटलं नाही. ’ज्यात गेलं वर्षभर बसत होतो हाच का तो वर्ग’ असा प्रश्न पडायचा. अशा भरलेल्या वर्गात जर कधी जाणं झालं तर मी माझ्या बसण्याच्या जागेकडे नजर टाकायचो आणि स्वत:ला तिथे बसलेला आणि अर्धा झोपाळू आणि अर्धा स्वप्नाळलेला कल्पायचो. पण ढिम्म. (अर्थात मला अजूनही मधल्या ओळीतल्या शेवटच्या बेंचवर बसलेला तन्मय आठवतो. तन्मय, त्याचा ठरलेला हेयर कट आणि त्याचा गाडीवाला कंपास बॉक्स :-) ) काहीच दिसायचं नाही. फ़क्त तिथे बसलेली मुलं माझ्याकडे तोंड उघडून बघत बसलेली दिसायची. मग गडबडीने नजर वळवायचो. :-)


आताशा आयुष्यातले ते सारे जुने वर्ग नव्याने आठवू लागले आहे आणि नव्या वर्गात कितींदा बसूनही तो साला आपलेपणा भेटतच नाहीये.

छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठा अर्थ काढायची सवय असली ना की असा त्रास होतो बघ! त्या छोट्य़ा गोष्टीचे ते छोटे संदर्भही मोठे होत जातात. कधीकधी इतके मोठे होतात की अर्थालाच व्यापतात ग्रहणासारखे. मग त्या ग्रहणात सूर्यासारखी तेजस्वी माणसंही काळवंडल्यासारखी दिसतात कधी कधी!

प्रिये, हे ग्रहण माझी आयुष्यभर सोबत करणार आहे की काय असं कधी कधी उगीच वाटून जातं...