Thursday, July 9, 2009

डॉलरच्या देशा - भाग एक

कोल्हापूरहून रात्री बोरीवलीच्या गाडीत बसलो. सोबत आई,बाबा आणि शेजारच्या एक काकू ज्यांच्या नातेवाईकांकडे आम्ही उतरणार होतो.

पहाटे साडे पाच वाजता गाडी पार्ल्याला थांबली. तिथे सारं सामान उतरवून घेतलं आणि रिक्षा करून त्या नातेवाईकांकडे गेलो. दिवसभर विश्रांती घेतली.
संध्याकाळी साधारण साडे पाच वाजता अचानक लक्षात आलं की आपल्या पाठीची सॅक जिच्यात एक फ़ाईल होती जिच्यात आयुष्यभराचे सारे ओरिजिनल सर्टिफ़िकेट्स होते ती आपण कुठेतरी विसरलो आहोत.

पायाखालची जमीन/वाळू/कार्पेट वगैरे सगळं सरकलं.

पोटात गोळा नंबर १.

शांतपणे विचार केल्यावर आठवलं की रात्री गाडीत माझ्याच सीटच्या खाली सॅक ठेवली होती. कधी नव्हे ते ट्रॅव्हल्स चं तिकीट ठेवलं होतं जपून. फ़ोन लावले. ड्रायव्हरचा नंबर घेतला. त्याला फ़ोन केला. त्यानं सांगितलं, ’सॅक आहे. बोरीवलीला फ़्लायओव्हरखाली गाडी थांबली आहे. येउन घेउन जा.’ आवाज येईल इतक्या जोरात माझा जीव भांड्यात पडला.

मग गडबडीने गाडीतून गेलो. सॅक,फ़ाईल सगळं ताब्यात घेउन सात वाजेपर्यंत परत आलो.

वाटलं की चला, संपलं सगळं. पण ही फ़क्त सुरवात होती...

सव्वा नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचलो. सगळ्यांचा निरोप घेउन, बहिणीशी फ़ोनवर बोलून आत गेलो. पहिल्या रांगेत उभा राहिलो. तिथल्या अधिकार्याने आय-२० आणि पारपत्र मागितलं. दिलं. त्यावर माझं शॆक्षणिक वर्ष १५ जून ला सुरू होणार आहे असं लिहिलं होतं. त्याने मला तारीख दाखवली. २१ जून. म्हणला की असं उशीरा जाता येणार नाही.

पोटात गोळा नंबर २.

मी सांगितलं की माझ्या प्राध्यापकांना ई-मेल लिहून त्यांची परवानगी घेतली आहे. हे ऎकल्यावर तो मला तिथंच थांबवून गायब झाला. ५-१०- तब्बल १५ मिनिटांनी तो परतला. हातात कागदपत्रं दिली आणि पुढे जाण्याची परवानगी दिली.

सगळ्या बाबींची पूर्तता करून विमानात बसलो. विमानाने थोड्या वेळात आकाशात झेप घेतली. काही तास उलटले. अचानक लक्षात आलं की पॅंटच्या खिशात पाकीट नाहीये. त्यात १००० रूपये, दुचाकीचा परवाना आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी होत्या.
पाठीची सॅक, गळ्यातली पिशवी तपासली. कुठेच नाही.

पोटात गोळा नंबर ३.

परिचारिकेला जाउन सांगितलं की पाकीट हरवलंय. ती म्हणाली की आम्हाला एक पाकीट मिळालंय. तुझंच आहे का बघ. बघितलं. माझंच होतं. तिचं आणि ज्या गुज्जू आजोबांनी ते पडलेलं उचलून तिला दिलं होतं त्या दोघांचे तीन-तीनदा आभार मानून जागेवर परतलो.

म्हणलं की आता तरी संपलं सगळं. पण...

विमान अटलांटाच्या विमानतळावर उतरलं. मी सारं सामान गोळा करून बाहेर पडत होतो. विमानाच्या बोगद्यात असतानाच असं वाटलं की बाजूला थांबून परत एकदा सारं सामान तपासावं. तपासलं. सगळं जागेवर होतं. सगळं. फ़क्त तेच एक पाकीट सोडून.

पोटात गोळा नंबर ४.

परिचारकाला सांगितलं. पाकीट आत राहिलंय. तो आश्चर्यचकित. "परत"? "हो". मग मला तिथेच थांबवून तो आत गेला. बर्याच वेळाने बाहेर आला. पाकीट हातात घेऊन. पाकीट कुठे सापडलं हे विचारायचं भानही मला राहिलं नाही. मग आमचा विमानचालक, मुख्य परिचारक आणि मी एकदमच विमानतळावर आलो. त्यांनी मला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. मनात म्हणलं , ’आता कशाला हव्यात शुभेच्छा?’ पण...

सामान तपासणीच्या रांगेत मी सर्वात शेवटी. अखेरीस माझा नंबर यायला सव्वा नऊ वाजले. तपासणी करून पुढे आलो. मग कळलं की अंतर्देशीय विमानतळासाठी एका रेल्वेतून जावं लागतं. बरीच पायपीट केल्यावर रेल्वे दिसली. चढलो. अर्थातच मला शेवटच्या स्थानकावर उतरायचं होतं. ते आलं, उतरलो. वेळ बघितली. ९:३०. १० वाजता माझं रॅले - डरहम चं विमान सुटणार होतं. त्या आधी चेक-इन. टर्मिनल नंबर बघितला. ३४. मी पहिल्या टर्मिनल ला होतो आणि ते विमानतळ एवढं मोठं आहे की मला ३४ नंबर दिसतही नव्हता.

पोटात गोळा नंबर ५.

सामान घेऊन पळत सुटलो. अखेरीस नंबर ३२ पर्यंत आलो. ३४ समोर दिसत होता. तेव्हढ्यात लक्ष आजूबाजूला गेलं. भिंतीवर निळे स्क्रीन्स होते आणि लोक त्यावर काहीतरी पाहत होते. पाहिलं. विमान नंबर आणि टर्मिनल नंबर लिहिला होता. माझ्या विमानाचा टर्मिनल नंबर पाहिला. तो बदलून ३४ चा २ झाला होता.

परत सामान घेऊन उलटा पळत सुटलो.

अखेरीस २ वर आलो. वेळ ९:५०. शेवटची सूचना दिली जात होती. गडबडीने गेलो. विमानात बसलो.

तासाभराने विमान रॅले - डरहम विमानतळावर उतरलं. बॅगेज क्लेम च्या पट्ट्याच्या इथे जाउन उभा राहिलो. बर्याच वेळाने माझ्या बॅग्स आल्या. घेतल्या. बाहेर आलो.

अमोल न्यायला येणार होता. अर्धा तास झाला. त्याचा पत्ताच नाही. फ़ोन करावा म्हणलं तर माझ्याकडे रोमिंग असलेलं कार्ड नव्हतं आणि जवळ पे-फ़ोन नव्हता.

अखेरीस तिथल्या एका माणसाला फ़ोन देण्याची विनंती करणार इतक्यात माझ्यासमोर गाडी थांबली. अमोल आला होता. मी सगळं सामान गाडीत टाकलं. गाडी सुरू झाली. मी गळ्यातल्या पिशवीतली सगळी कागदपत्रं तपासली. काहीही विसरलो नव्हतो. गाडी विमान तळातून बाहेर पडली. मुख्य रस्त्यावर आली.

मी आजूबाजूला पाहिलं. चौपदरी रस्ते. गर्द झाडी. भरधाव जाणार्या गाड्या. आणि मग मला ती जाणीव येऊन भिडली -

जवळपास एक वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर, अनेक अडचणींना तोंड दिल्यानंतर, आप्त आणि मित्रांच्या मदतीच्या आणि अगणित स्नेह्यांच्या शुभेच्छांच्या बळावर मी एका स्वप्नाची पूर्तता पाहत होतो.

मी अखेरीस अमेरिकेला पोचलो होतो...