Tuesday, April 29, 2008

मागणे माझे भगवंता

मागणे माझे भगवंता
एकदा पुरे करी
सोडूनी ती शेषशय्या
पाय ठेवी पृथ्वीवरी

दावितो फ़िरवूनी तुजला
आमुची आयटी सिटी
डॉलर आहे देव इथला
अन तयाचे दास किती

ही पहा आली फ़रारी
थंड निळी ती कॅब असे
गरूडयान का आठविशी?
झडली तयाची सर्व पिसे


असे इथे सेंट्रलाईज्ड एसी
थंडीत काटा येई पटकन
भूषविती अंगावर सारे
युनाईटेड कलर्स ऑफ़ बेनेटन


हिरवळ सामोरी दिसते जरी
पाय न ठेवी तिजवरी
असशील मोठा भगवंत तू पण
ऍक्सेस कार्डाविण न एंट्री


हा आला कॅफ़ेटेरिया, इथे
कोणताही जिन्नस असे
अमृत न मागती कोणी अन
विष ’आउट ऑफ़ स्टॉक’ असे

तहान तुजला लागली का
वससी क्षिरसागरी तरी?
पाणी नसे या यंगिस्तानी
पेप्सी मिळते जरीया धुराच्या पडद्यामागे
सॉफ़्टवेअर इंजिनियर दिसे
’सर’ म्हणती सारे याला, हा
’सरेल का जीवन?’ पुसे

मागणे माझे भगवंता
एकदा पुरे करी
स्पष्ट सांग रे, काय प्रयोजन
माझे या पृथ्वीवरी?