Friday, February 8, 2008

प्रिय


कोरा कागद जितका कोरा तितकाच भरलेला.

भरलेला कागद फ़क्त त्यावरच्या शब्दांचा होवून राहतो. त्याच्यावर उमटणा-या प्रत्येक अक्षराची माळ पडते त्याच्या गळ्यात. मग पातिव्रत्याचं भान राखत तो फ़क्त आणि फ़क्त लिहिलेल्या अक्षरांशीच संग करतो.

त्यातूनही असतात काही, जे अक्षरांची बंधनं तोडून थेट भिडतात वाचकाच्या ह्रुदयाला. दाखवतात त्याला लेखकाचे अपुरे शब्द आणि त्यामागच्या अधु-या भावना.

को-या कागदाने मात्र छातीत रोखून धरलेली असतात विचारांची वादळं, दु:खाचे कढ आणि प्रेमाची एखादी गुलाबी झुळूक. It just keeps us guessing. काय उतरेल या कागदावर? लिहिली जातील का याच्यावर क्रांतीगीते? की हळूवार उतरेल एखादं प्रेमाचं द्वंद्वगीत? की गिचमिड अक्षर आणि कळकट मनाने यावर ओकला जाईल काळ्याकुट्ट शाईतून एखादा अश्लील मजकूर?

कुणास ठावूक.

कधी एखाद्या अस्सल पंजाबी संपूर्णसिंह गुलजार च्या हाती आलेल्या को-या कागदावर ’तेरे बिना जिंदगीसे शिकवा’ उतरतं तर कधी एका कर्नाटकातल्या प्रोफ़ेसराने लिहिलेल्या कागदावरची ’स्वामी’ किंवा ’ऑर्फ़ियस’ आतून हलवते.

एखाद्या तासाला वहीच्या शेवटल्या पानावरल्या ४ ओळी किंवा परिक्षा चालू असताना प्रश्नपत्रिकेच्या मागे उद्वेगाने लिहिलेली कविता असो, त्या बेट्या कागदाचं भविष्य काही भाकता येत नाही.

आजकाल को-या कागदावरून नजर ह्टत नाही. लिहिण्यासारखं काही नसतं म्हणून नाही तर वाचण्यासारखं खूप काही सापडतं म्हणून....