Friday, December 7, 2007

बॉलीवूडगिरी - भाग १

हिंदी सिनेमा या गोष्टीवर मी बेहद्द फ़िदा आहे. तेही अगदी लहानपणापासून. म्हणजे मी तिसरी चॊथीत असताना दूरदर्शनवर शनिवारी दुपारी ३-४ वाजता हिंदी सिनेमा लागायचा आणि मी तो न चुकता बघायचो. तेव्हापासून लागलेलं हे सिनेमाचं वेड आजतागायत कायम आहे.

सिनेमाशी निगडीत काही गोष्टी अगदी close to my heart आहेत.

’सरफ़रोश’ बघायला जेव्हा थेटरात गेलो तेव्हा बाहेर सिनेमाचं भलंमोठं पोस्टर लागलेलं होतं. आजही ’सरफ़रोश’चा कुठे विषय निघाला की ते पोस्टर आठवतं. पाठमोरा आमिर, त्याच्या हातातली पिस्तोल आणि समोर उगवता सूर्य. (सूर्य उगवता की मावळता हा ज्याचा त्याचा perspective आहे :)) बस्स. अगदी साधं पोस्टर पण जबरदस्त परिणाम साधतं. एका मध्यमवर्गीय पांढरपेशा घरातल्या साधारण मुलाला अंतर्बाहय बदलून टाकणारी परिस्थीती , वर्तमानाला सामोरा जाता जाता गतकाळाकडे त्यने टाकलेली नजत आणि देशाचं भविष्य घडवण्यासाठी त्याला हाती धारण करावं लागणारं शस्त्र. केवळ अप्रतिम.

बर्याच जणांसाठी ’दिल से’ आणि ’छॆया छॆया’ हे दोन समानार्थी शब्द आहेत. मला मात्र आठवते ती स्टेशनवरची रात्र, काळी शाल पांघरलेली ’अजनबी’ आणि 'अमरकांत वर्मा - all india radio'. रेल्वे सुटते आहे, ती दारात उभी, मागे वळून पाहते, त्याच्या हातात वाफ़ाळणारा चहाचा ग्लास आणि त्याच्यात पडणार्या पावसाच्या पाण्याचा होणारा आवाज.. कोण असेल ती? का बरं अशी एकटीच होती बसलेली? कुठून आली असेल आणि कुठे चालली असेल? परत गाठ पडेल का तिची माझी? की या रात्रीसारखीच तिही एक आठवण बनून मनाच्या तळाशी दडून राहील आयुष्यभर? मग कदाचित अशाच एखाद्या पावसाळी रात्री ती आठवेल आणी मनाला हुरहुर लावून जाईल.

बेचॆन करणार्या त्या प्रसंगामध्ये एका स्वतंत्र कथेइतकं सामर्थ्य आहे.


दिल चाहता हॆ च्या शेवटून दुसर्या सीनमध्ये आमिर त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. तिथे एक् शोपीस आहे त्याच्या टेबलावर. काचेच्या त्या शोपीसमध्ये निळंशार पाणी हिंदकळतंय. तो शोपीसही दोलायमान अवस्थेत आहे. एकदा इकडे झुकतो तर एकदा तिकडे. आमिरच्या मनाची अवस्था दाखवण्यासाठी वापरलेलं हे रूपक अफ़ाट आहे. कॉलेजच्या दिवसांमध्ये जी मॆत्री झाली ती खरीच मॆत्री होती की तो त्या वेळेचा, परिस्थितीचा परिणाम होता? आज आयुष्यात ईतके बदल घडल्यानंतरही ’ही मॆत्री टिकायलाच हवी’ असं वाटतंय का?

हे आणि कदाचित आणखीही बरंच काही तो शोपीस सांगून जातो.

To be continued... (पिक्चर अभी बाकी हॆ मेरे दोस्त :) )

1 comments:

ethan hunt said...

it's nice to recieve something "lite" from u....
u can add munnabhai - circuit scene...(before interval,when munna slaps circuit and apologizes...)