Monday, December 17, 2007

प्रिय

स.न.वि.वि. सारं काही क्षेमकुशल ना? खरंतर हे पत्र मी कसा आहे हे सांगण्यासाठी लिहीत आहे. त्यामुळे याहून जास्त ऒपचारिक होता येणार नाही. क्षमस्व.

मी ठीक आहे. म्हणजे तसा बरा आहे. रोज न चुकता जगण्याचा प्रयत्न करतो. दरवेळी जमतंच असं नाही. पण म्हणून प्रयत्न न करण्यात काही अर्थ नाही हेही कळून चुकलंय.

तसा दिवस गडबडीतच जातो. येणार्या क्षणाची वाट बघणं आणि गेलेल्या क्षणांचा हिशोब मांडणं या गडबडीत हातातला क्षण कसा निसटून जातो कळतच नाही. पण आपले सारे क्षण आपले कुठे असतात? सारं आयुष्यच देवाणघेवाण होवून बसलं आहे.
काही क्षण द्यायचे अन बदल्यात काही मिळवायचे. कधी कमी देउन जास्त मिळतं अन कधी खूप काही देउनसुद्धा झोळी रितीच रहाते.

एखाद्या शांत संध्याकाळी वाटतं, पडावं बाहेर या बिल्डिंगमधून. उपभोगावी ही संध्याकाळ. मावळत जाणार्या त्या सूर्याला करावं कॆद मुठीत. पकडून ठेवावा हा क्षण. आकाशातले हे अगणित रंग जणू पुन्हा कधी दिसणारच नाहीयेत. तो सूर्य मावळतो आहे तो पुन्हा न उगवण्यासाठीच.अन जर उगवलाच तो उद्या तर असेल अगदी उष्टावलेला अन या संध्याकाळच्या बेहोशीतच तो करेल उद्याची मार्गक्रमणा.

नेमक्या अशाच क्षणी जाणवतं की कर्तव्याची अद्रुष्य बंधनंच तोडायला जास्त अवघड असतात.

मग हुरहुरत त्या सूर्यास्ताकडे पहात रहातो. पहात राहतो पश्चिमेला रंगलेली मॆफ़ल आणि तिची भगव्या छ्टेच्या भॆरवीने होणारी सांगता. हळूहळू अंधार पडतो आणि मी कामाकडे वळतो.

प्रिय, परवा काय झालं माहितंय? मल्टिनॅशनल कंपनीच्या गेटबाहेरच्या चकचकीत रस्त्यावरच एक मरतुकडा बॆल मटकन खाली बसला होता. त्याचा हाडं हाडं दिसणारा गाडीवान त्याला चुचकारून उठवत होता. एवढ्यात पोट सुटलेला कंपनीचा वॉचमन आला आणि गाडीवानावर डाफ़रला. हो , नेमका त्याच वेळी एखादा अति-संवेदनशील (emotional fool म्हण हवं तर) अभियंता आला असता तर ’इंडिया शायनिंग’ वगॆरे त्याच्या भ्रमाला सुरूंग लागला असता. आधीच वाढत्या संधींमुळे अट्रीशन रेट वाढत चाललाय. त्यात असल्या ’फ़ालतू’ कारणामुळे एखादा अभियंता कंपनी सोडून गेला तर मग प्रोजेक्ट वेळेवर संपणार कसा?

अखेर गाडीवानानं चिडून बॆलाचं शेपूट पिरगाळलं.तरी तो उठेना. एवढ्यात मागे भलीमोठी इंपोर्टेड कार येउन उभी राहिली. ड्रायव्हर हॉर्न वाजवू लागला. हॉर्नचा आवाज,गार्डच्या शिव्या आणि कदाचित पोटातली भूक या सगळ्यामुळे संतापून गाडीवानाने बॆलाची पाठ सोलवटून काढली. अखेर बॆल उठला अन चालू लागला.

’लीड इंडिया’ वगॆरे कार्यक्रमात किंवा ’आज तक’ वर तो बॆल आणि गाडीवन दिसायला हवे होते. किमान पोटभर अन्न नाही तरी हजार एक एसेमेस तरी त्याच्या वाट्याला नक्कीच आले असते.

Friday, December 7, 2007

बॉलीवूडगिरी - भाग १

हिंदी सिनेमा या गोष्टीवर मी बेहद्द फ़िदा आहे. तेही अगदी लहानपणापासून. म्हणजे मी तिसरी चॊथीत असताना दूरदर्शनवर शनिवारी दुपारी ३-४ वाजता हिंदी सिनेमा लागायचा आणि मी तो न चुकता बघायचो. तेव्हापासून लागलेलं हे सिनेमाचं वेड आजतागायत कायम आहे.

सिनेमाशी निगडीत काही गोष्टी अगदी close to my heart आहेत.

’सरफ़रोश’ बघायला जेव्हा थेटरात गेलो तेव्हा बाहेर सिनेमाचं भलंमोठं पोस्टर लागलेलं होतं. आजही ’सरफ़रोश’चा कुठे विषय निघाला की ते पोस्टर आठवतं. पाठमोरा आमिर, त्याच्या हातातली पिस्तोल आणि समोर उगवता सूर्य. (सूर्य उगवता की मावळता हा ज्याचा त्याचा perspective आहे :)) बस्स. अगदी साधं पोस्टर पण जबरदस्त परिणाम साधतं. एका मध्यमवर्गीय पांढरपेशा घरातल्या साधारण मुलाला अंतर्बाहय बदलून टाकणारी परिस्थीती , वर्तमानाला सामोरा जाता जाता गतकाळाकडे त्यने टाकलेली नजत आणि देशाचं भविष्य घडवण्यासाठी त्याला हाती धारण करावं लागणारं शस्त्र. केवळ अप्रतिम.

बर्याच जणांसाठी ’दिल से’ आणि ’छॆया छॆया’ हे दोन समानार्थी शब्द आहेत. मला मात्र आठवते ती स्टेशनवरची रात्र, काळी शाल पांघरलेली ’अजनबी’ आणि 'अमरकांत वर्मा - all india radio'. रेल्वे सुटते आहे, ती दारात उभी, मागे वळून पाहते, त्याच्या हातात वाफ़ाळणारा चहाचा ग्लास आणि त्याच्यात पडणार्या पावसाच्या पाण्याचा होणारा आवाज.. कोण असेल ती? का बरं अशी एकटीच होती बसलेली? कुठून आली असेल आणि कुठे चालली असेल? परत गाठ पडेल का तिची माझी? की या रात्रीसारखीच तिही एक आठवण बनून मनाच्या तळाशी दडून राहील आयुष्यभर? मग कदाचित अशाच एखाद्या पावसाळी रात्री ती आठवेल आणी मनाला हुरहुर लावून जाईल.

बेचॆन करणार्या त्या प्रसंगामध्ये एका स्वतंत्र कथेइतकं सामर्थ्य आहे.


दिल चाहता हॆ च्या शेवटून दुसर्या सीनमध्ये आमिर त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. तिथे एक् शोपीस आहे त्याच्या टेबलावर. काचेच्या त्या शोपीसमध्ये निळंशार पाणी हिंदकळतंय. तो शोपीसही दोलायमान अवस्थेत आहे. एकदा इकडे झुकतो तर एकदा तिकडे. आमिरच्या मनाची अवस्था दाखवण्यासाठी वापरलेलं हे रूपक अफ़ाट आहे. कॉलेजच्या दिवसांमध्ये जी मॆत्री झाली ती खरीच मॆत्री होती की तो त्या वेळेचा, परिस्थितीचा परिणाम होता? आज आयुष्यात ईतके बदल घडल्यानंतरही ’ही मॆत्री टिकायलाच हवी’ असं वाटतंय का?

हे आणि कदाचित आणखीही बरंच काही तो शोपीस सांगून जातो.

To be continued... (पिक्चर अभी बाकी हॆ मेरे दोस्त :) )