Sunday, March 18, 2007

नववर्षाभिनंदन !

"अहो जरा अमोलला उठवा. साडे पाच वाजलेत. वर्षाचा पहिला दिवस. निदान आजच्या दिवशी तरी लवकर उठ म्हणावं."
"हो गं बाई. झोपू दे ना जरा त्याला. आज सुट्टी आहे कॉलेजला. रात्री बराच उशीरापर्यंत ऑर्कुट ऑर्कुट खेळत होता. उठायला होणारच की उशीर."
"छान! आणि तुंम्ही हे कॊतुकाने सांगताय? कमाल आहे तुमची पण!"
"काय दंगा चाललाय तुमचा सकाळी सकाळी?" अमोल डोळे चोळत बाहेर येत म्हणाला.
"बघ. मी म्हटलं होतं की नाही, उठेल तो वेळेत म्हणून."यावर 'तुंम्ही असं कधी म्हणाला' असं अमोलची आई विचारेपर्यंत अमोल म्हणाला, "मी झोपलोच नाही रात्री".
"अवघड आहे या पोराचं", कपाळावर हात मारून घेत अमोलची आई म्हणाली."हा काय वेडेपणा? रात्री झोपायला काय झालं होतं?"
"बाबा, रात्री मित्राशी मेसेंजरवर गप्पा मारत बसलो. साईन आउट करून झोपेपर्यंत मित्रांचे नववर्षाभिनंदनाचे समस यायला सुरवात झाली. त्यांना उत्तरं पाठवता पाठवता ५ वाजले. म्हटलं नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी तरी.... काय आई? "
"हो. कळला बरं का टोमणा. आता आवर पटापट उठलाच आहेस तर."
"आवरतो गं. पण काय मेसेजेस येत होते भल्या पहाटे. एक जण म्हणतोय "मराठी नववर्षाच्या शुभेच्छा", एक म्हणतोय "हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा". नक्की कुणालाच माहित नाही कुठला सण साजरा करतोय ते. फ़ुकटचे मेसेजेस संपवणं महत्त्वाचं. माझा एक मित्र तर गेल्या वर्षी "फ़िरंगी नववर्षाच्या शुभेच्छा" असं १ जानेवारी ला म्हणत फ़िरत होता. आता पाश्चात्य संस्कृतीचा एवढा राग असेल तर मग अभिनंदन करायचं कशाला?"
"हो ना. तरी नशीब, पाडवा आणि दसरा असल्या सणांच्या दिवशी खरेदी खूप होते, त्यामुळे व्यापाऱ्यांचा आणि पर्यायाने पेपरवाल्यांचा ईंटरेस्ट अजून टिकून आहे. नाहीतर कालॊघात असले सण नामशेषच व्हायचे."
"पण बाबा फ़रक काय पडतो एखाद दुसरा सण विसरला गेला तर? असेही आपल्याच धर्मात सगळ्यात जास्त सण आहेत. आपण त्यातले बहुतेक सण साजरे करतोच. हा आता साजरे या शब्दाचे जे अनेक अर्थ निघतात त्यातला आपल्याला मानवणारा अर्थ आपण निवडलाय. पण तरीही जर प्रत्येकच सणाला दुपारी गोड खाउन झोपायचं असेल आणि संध्याकाळी गाडीतून गच्च भरलेल्या रस्त्यांतून खरेदी करत फ़िरायचं असेल तर मग हे आपण एखाद्या रविवारीही करू शकतोच की. त्यासाठी देवाची पूजाच कशाला करायला हवी?"
"अहो, आता ही महाचर्चा थांबवा थोडा वेळ. लवकर आंघोळ करून घ्या. आपल्याला सारसबागेतल्या गणपतीला जायचंय. याला काय, आज कुठे बाहेर जायचं नाही त्यामुळे उशीरा आंघोळ केली तरी चालेल.""हे काय? मी पण येणार आहे सारसबागेला. म्हणून तर उठलोय लवकर.""अग्गं बाई. खरच की काय? काय हो आज सूर्य कुठे उगवलाय बघा जरा."
"प्रिये, आपल्या सुपुत्राच्या मनात जी अचानक देवभक्ती उचंबळून आलीये त्याचं कारण मी सांगतो. कुठल्याही सणाच्या दिवशी सकाळी सारसबागेचा गणपती हे पक्षीनिरीक्षणासाठीचं आयडीयल ठिकाण आहे. छान छान तरूण मुली नटून थटून आई वडिलांबरोबर देवदर्शनाला येतात यापरती दुसरी पर्वणी कुठली? काय अमोल ? आणी लेका तु विचारतोस होय 'सण कशासाठी म्हणुन?'".

आपल्यावरचा हमला थोपवून धरण्यासाठी अमोलने रेडियो सुरू केला आणि मिर्ची वरून चक्क आकाशवाणी पुणे वर नॉब फ़िरवला.

बाबूजी गात होते.
" त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजयकार
पुष्पकयानातुनी उतरले स्वर्गसॊख्य साकार "

Thursday, March 15, 2007

लोड-शेडिंग

उकाडा. रात्रीची वेळ. अंगावर घोंघावत येणारी डास,चिलटं. आजुबाजूला महतप्रयासाने दबलेला कोलाहल. जणू होता होता राहिलेला विस्फ़ोट.

"काय कटकट आहे!", तो न जाणे कितव्यांदा स्वत:शीच पुटपुटला.हे नेहमीचंच आहे. असल्या वेळा त्याच्या अंगावर धावून येतात. त्याचं स्वामित्व काही क्षणांपुरतं का होईना,पण झुगारून देऊन भूतकाळ समोर उभा रहातो. मग सुरु होतो नेहमीचाच खेळ. गतकाळातले निर्णायक क्षण समोर उभे ठाकतात. मग पर्यायांचा विचार त्याला फ़रफ़टत नेतो. तेवढा वेळ तो कोणीतरी वेगळाच असतो.

एखाद्या माणसाबद्दल विचार करणं आणि तो आपल्याबद्दल काय विचार करत असेल याचे आराखाडे बांधणं हा त्याचा फ़ावल्या वेळातला खेळ. दुसर्याच्या मनात शिरून त्याचं सुख आणि दु:ख अनुभवायचा प्रयत्न करायचा. उद्देश एकच. मी इतरांपेक्षा सुखी असो वा दु:खी , मी 'वेगळा' आहे ही सुखद जाणीव. भूतकाळाने ओरबाडल्यानंतर झालेल्या जखमांतून जणू त्याचा वेगळेपणाचा आनंद झिरपत असतो.


रात्र वाढत असते. वर्तमानापासून दूर, हव्याशा वाटणार्या भविष्यात त्याच्या भरार्या चालू असतात.

शेजारची माणसं आणि अंगावर बसणारे किडे यांतला फ़रक बघता बघता नाहीसा होतो. माणूस शेवटी किडाच. जन्माला येतो, टिचभर पोट जे कधी भरतच नाही ते भरण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत असतो. आयुष्यातली सुखं दु:खं त्यात्या वेळी किती मोठी वाटतात. पण अशा क्षणी त्यांच्यात अडकलेला भावनांचा गुंता बाजूला काढला की उरतो तो फ़क्त क्षणांचा हिशोब!. "बापरे, आजकाल फ़ारच विचार करतोय मी". स्वत:ला वर्तमानात आणण्याच्या त्याच्या या चालीची त्याच्या मनाला आता चांगलीच सवय झालेली असते. ते दाद लागू देत नाही.

इतक्यात दूर कुठेतरी म.रा.वि.मं. चा कुणीतरी कर्मचारी कुठला तरी खटका दाबतो. सहस्त्रसूर्यांच्या तेजाने सगळं शहर उजळून निघतं. खुंटा घालून अडकवलेलं जीवनाचं रहाटगाडगं पुन्हा सुरू झालेलं असतं.
बाळबोध संस्कारांमुळे दिव्याकडे बघत त्याचे हात आपोआप जोडले जातात. मनातली सगळी जळमटं झटकत तोही पुटपुटतो, 'शुभंकरोती कल्याणम.......'.