Tuesday, February 27, 2007

शुभमंगल सावधान..

मी आत्तापर्यंत बर्याच लग्नांना हजेरी लावलेली आहे आणि जवळपास प्रत्येक लग्नात एक गोष्ट नेहमीच notice केलीये. म्हणजे बघा नात्यातल्या कुणाचं लग्न नसेल तर आपण शक्यतो मंगलाष्टकं पडायच्या थोडं आधी कार्यालयात पोचतो. दाराजवळचं टेबल तोवर रिकामं झालेलं असतं. (टेबलापाशी उभं राहुन येणार्यांचं सुहास्य वदनानं स्वागत करणार्या ललनांनी आधीच आत प्रयाण केलेलं असतं.) टेबलावर फ़क्त अक्षतांचं ताट असतं. चेतक सुपारी, गुलाबाची फ़ुलं आणि पेढ्यांचे chocolates संपलेले असतात. अत्तराचा फ़वारा करणारा fan पण बंद झालेला असतो. आपण मुठीत बचकभर अक्षता घेउन आतल्या गर्दित घुसतो. बरीचशी लग्नं उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात असल्यानं कपडे ओले झालेले असतातच.

एवढ्या सगळ्या प्रयासानंतर आपण गर्दित उभे रहातो. वर आणि वधु एवढ्या गर्दितून दिसतच नाहीत. मग भटजी हातात माईक घेउन मंगलाक्षता सुरू करतात. अत्यंत भसाड्या आणि मोठ्या आवाजात. अशा वेळी काही "अनुभवी" मंडळींना जोर चढतो. "सावधान" येण्याआधीच ते अक्षता टाकु लागतात. मग आपणही टाकतो. मागुन कुठुनतरी घामाने भरलेल्या मानेवर सटासट अक्षता बसत असतात. हे असं दोन मिनिटं चालतं. आपण अंदाज घेउन अक्षता टाकत असतो. उगाच "शुभमुहुर्तो सावधान" च्या वेळी अक्षता संपल्याने बावळटासारखं हात बांधुन उभं रहावं लागु नये म्हणुन! पण कसचं काय. ज्यांची कुठलीही कविता कधी रविवारच्या पुरवणीत सुद्धा छापली गेलेली नाही अशा कुठल्यातरी काकु किंवा मामींना जोर चढतो. भटजींच्या हातुन माईक हिसकावुन घेउन त्या गायला लागतात. आहाहा ! काय तो आवाज, काय ते शब्द ! नुसतं र ला र, ट ला ट.

बाळाची आई मायाळू , बापही कनवाळू.
नव्या सुनेला ओवाळू , प्रेमाने !

च्यायला ईथे उकडून जीव जात असतो आणि काकु सूड उगवत असतात. न चढणार्या,चिरक्या आवाजात गाऊन. भटजी जरा रागावलेले असतात , त्यांच्यावरचा हक्काचा प्रकाशझोत हिरावला गेल्याने. अखेर पत्रिकेत दिलेल्या मुहुर्ताच्या बरोबर १७ मिनिटांनंतर भटजींच्या हातात पुन्हा माईक येतो. शेवटलं कडवं झालं की आपण उरल्या सुरल्या अक्षता टाकुन आधीच बघुन ठेवलेल्या जेवणविभागाकडे धाव घेतो. थोड्याफ़ार फ़रकाने सगळ्या लग्नांची कहाणी अशीच सुफ़ळ संपूर्ण होते.

असाच सार्वजनिक ठिकाणी कलागुणप्रदर्शनाचा दुसरा नमुना म्हणजे मंदिरातल्या आरत्या! त्यातल्या त्यात मारूतीच्या मंदिरात आरती चालु असली तर रांगेत पुढे उभे राहुन गाणार्यांच्या अंगात साक्षात महारूद्र हनुमानच संचारले आहेत असं वाटतं. घंटा किणकिण नागरा म्हणताना यांचा आवाज किणकिणत तर नाहीच पण घंटेसारखा डोक्यात ठणठणत असतो. एकदा चुकुन मी आरतीच्या वेळेत मारूतीच्या मंदिरात जाण्याचा आणी देवाचं दर्शन घेण्याचा प्रमाद केला. त्या हनुमंताच्या भक्तजनांनी माझ्याकडे असे काही जळजळीत कटाक्ष टाकले की मी घाबरून काढता पायच घेतला.

एकदा गणपतीबाप्पाच्या मंदिरात गेलो होतो. दर्शन घेतलं. शहाण्या बाळासारख्या प्रदक्षिणा घालायला सुरवात केली. मंदिरात फ़क्त एक आज्जी होती. तिच्या चेहर्यावरुन संत्रस्त झालेली दिसत होती. मी आपला अथर्वशिर्ष म्हणत आपल्याच नादात प्रदक्षिणा घालत होतो. ५वी प्रदक्षिणा सुरू होणार ईतक्यात आज्जी वसकन अंगावर आली. "ए बाबा आधी प्रसाद घे. प्रदक्षिणा नंतर घालत बस." मी मुकाट्याने प्रसाद घेतला. अथर्वशिर्षाचं कडवं तर तोपर्यंत विसरलोच होतो. तो प्रसाद हातात धरून परत पहिल्यापासून स्तोत्र म्हणत माझ्या प्रदक्षिणा सुरू झाल्या. हात चिकट. जोडताही येईनात. अखेर तसाच देवाला दंडवत घालून बाहेर पडलो.

आजकाल मंदिर रिकामं असल्याशिवाय मी शक्यतो आत जाण्याचं धाडस करत नाही. न जाणो कुठुन आज्ज्या येतील आणि.......

Sunday, February 25, 2007

मित्र असावा ऎसा गुंडा

शाळेत असताना मित्र, माझा मित्र, आवडता मित्र , जिवलग मित्र असल्या बर्याच विषयांवर निबंध लिहिलेत. मराठी माध्यम असल्याकारणाने my best friend या शिर्षकाखाली विंग्रजीतही अक्कल पाजळली. अर्थात a friend in need... वगॆरे लिहायला ठीक आहे. पण वास्तविक आयुष्यात पुस्तकी व्याख्येत बसणारा मित्र मिळणं फ़ार अवघड. पण जेव्हा कळतं की मॆत्री ही असल्या कुचकामी व्याख्यांच्या पलिकडली गोष्ट आहे तेव्हा मात्र गंमत वाटते आणि मग आपण खुलेपणाने आपल्या मित्रपरिवाराकडे बघतो. काही नव्या कसोट्या वापरून. जशा की ... जुने अनुभव, अंतरीची गाठ , सहवासातला मोकळेपणा.. वगॆरे वगॆरे.

मला मित्र बरेच आहेत. त्यात आणि hostelite असल्यानं गेली साडे तीन वर्षं मी मित्रांच्या गराड्यातच आहे. दिवसाचे चोवीस तास मित्रांचाच सहवास. शाळेत असताना मित्र नव्हते अशातला भाग नाही. पण त्यातल्या बहुतांश मित्रांशी नाड जुळलीच नाही. आम्ही सगळेच लहान होतो किंवा मी आताइतका प्रगल्भ नव्हतो किंवा वयापेक्षा जास्तच शहाणा होतो.. कारण काहीही असू शकेल. पण मित्रांवरचे निबंध लिहिताना काहीतरी खोटं,क्रुत्रिम लिहितोय असं नक्कीच वाटायचं. त्यावेळचे मित्रही छान होतेच. आजही माझी त्यांच्याशी मॆत्री टिकून आहे. .but still something was missing.

सुदॆवाने पुण्यात आल्यानंतर बरेच नविन मित्र भेटले , काही जुन्या शाळकरी मित्रांची नव्याने ओळख झाली. त्यामुळेच तर हा मित्रांवरचा लेख लिहिताना आज फ़क्त छानच वाटतंय. मनात दुसरी कुठलीच भावना नाहीये. गेलं एक वर्ष तर मैत्रीखात्याच्या द्रुष्टीने भरभराटीचं ठरलं. मित्रांची फ़ार वेगळी रूपं फ़ार जवळून बघण्याचा (/वाचण्याचा / ऎकण्याचा ) योग आला. वरच्या कसोट्यांमधे खरे उतरणारे बहुतांश मित्र पुण्यातले आहेत. काहींशी तर गेल्या दीड वर्षातलीच ओळख आहे. पण आज मात्र नवल वाटतं की मी इतकी वर्षं या लोकांशिवाय कशी काढली? बरं आता चांगले मित्र तर मिळाले. मग यातला सर्वात चांगला मित्र कोणता? नाही नाही. चांगले तर सगळेच आहेत. जवळचाही म्हणता येणार नाही . फ़क्त कॊटुंबिक आणि शॆक्षणिक पार्श्वभूमी माहित असली म्हणजे मित्रोत्तम झाला असं थोडीच असतं? अर्थात आज असे बरेच मित्र आहेत म्हणून मी हे करू शकतो. अन्यथा मित्रनिवडीचा प्रपंच करण्याची गरजच काय पडली असती?

जरा निरखून बघितलं तर या गर्दित एक मित्र उठून दिसतो. याच्याशी ओळख म्हणली तर चार वर्षापूर्वीची. पण याचं खरं स्वरूप उलगडलं ते गेल्या वर्षी. त्याच्याशी कित्येक तास मारलेल्या अर्थक आणी निरर्थक गप्पांनंतर उलगडलं की आपण मित्र या प्राण्याकडुन ज्या काही अपेक्षा करत होतो त्यातल्या बहुतांश अपेक्षांची पूर्ती इथे होतेय. पण माझं बाळबोध मन त्याला माझा सर्वात जिवलग मित्र अशी माझ्या द्रुष्टीने महत्त्वाची पदवी द्यायला तयार नाहीये. कारण क्षुल्लक आहे. मी कदाचित त्याचा सर्वात चांगला, जवळचा मित्र नाहीये. चार वर्षांपूर्वी ही गोष्ट मला अपमानकारक वाटली असती. मी फ़क्त या कारणास्तव त्याच्याशी मनासारखं बोलू शकलो नसतो. पण आता कळून चुकलंय की मित्राला तो आहे तसं स्विकारणं हीच तर मॆत्रीची खरी कसोटी नाही का? आणि मॆत्रीत अटी कसल्या घालायच्या? तो माझा सर्वात चांगला मित्र आहे ही बाब आज माझ्यासाठी पुरेशी आहे. माझं त्याच्या आयुष्यातलं स्थान काय आहे याने मला आज फ़ारसा फ़रक पडत नाही. त्याचं मात्र माझ्या आयुष्यातलं स्थान वेगळंच आहे.

तो हुषार आहे, लोक त्याला वेडा म्हणतात. तो स्मार्ट आहे , लोक त्याला गबाळा म्हणतात. तो खूप वाचतो, लोक त्याला रिकामटेकडे धंदे म्हणतात. तो विचार करून बोलतो, लोक म्हणतात "तो ना? काहीही बरळत असतो". तो मनातलं तोंडावर बोलतो, लोक त्याला फ़टकळ,बेअक्कल म्हणतात. त्याची लेव्हल कळायला मला चार वर्ष लागली,बाकीच्यांचं सोडाच. त्याच्या घरच्यांनी त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं त्याच्या लहानपणीच बंद केलं. आम्ही मनातल्या मनात पुण्यात चार वर्षांनी फ़्ल्याट घेतला तर किती हप्ता पडेल याची गणितं करत असतो आणी हा मात्र जाहीर करतो "मी दहा वर्षानी millionaire होणार आहे." तो जितक्या उत्कटतेने english movies बघतो तितक्याच उत्कटतेने वेदांतही वाचतो. त्याला आयुष्याचा अर्थ शोधायचाय. तोही लवकर. वेळ नाहीये त्याच्याकडे. धोपटमार्ग झुगारायची त्याची धडपड मी स्वत: बघितली आहे. त्याच्या निम्म्याहून अधिक मित्रांना तो काय चीज आहे हे अजूनही कळलेलं नाहीये. तो परफ़ेक्ट नाहीये. पण परफ़ेक्ट होण्याची इतकी प्रबळ ईच्छा फ़ार कमी जणांकडे असते हे नक्की. मला त्याच्या सगळ्याच गोष्टी पटतात असं नाही. काहीवेळा मला त्याचा रागही आला आहे, मी त्याच्या नावाने ईतरांकडे खडेही फ़ोडले आहेत. त्याला माझी सगळी माहिती आहे , तो माझ्या नेहमी मदतीला धावून येतो , आम्ही रोज संपर्कात असतो , त्याच्या आयुष्यात काय चालू आहे हे तो मला नियमितपणे सांगतो.... यातलं काही एक घडत नाही. थोडक्यात यातलं काहीच बेस्ट फ़्रेंड च्या व्याख्येत बसणारं नाहीये. तरीही......


परवा त्याच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवली. तो कदाचित दहा वर्षात millionaire होईलही. पण मला मात्र आजच त्याच्या मॆत्रीने श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय.

Wednesday, February 21, 2007

अन्न हे पूर्णब्रम्ह

माणूस खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो?

सकाळ, दुपार,संध्याकाळ,रात्र.
चहा, नाश्ता, जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण.
कुणाची ट्रीट, कुणाची पार्टी, कुणाला ’फ़ाडला’.

ब्रेड , बिस्किट , खारी , रविवारी पॅटीस , क्रीमरोल , पोहे , उप्पीट , शिरा , ईडली.
चटणी , कॊशिंबीर , भाजी , चपाती , भात .
बटाटेवडा , भजी , sandwich .
पिझ्झा , बर्गर , पास्ता.
भेळ , एसपीडीपी , पाणीपुरी , दहिवडा.


अम्रुततुल्य , कॅंटीन , मेस , होटेल , घर.
चायनीज , पंजाबी , महाराष्ट्रीयन थाळी , गुजराती थाळी.

मेस अशी , मेस तशी . तिखट जेवण , आळणी जेवण.


रोज रोज उसळ, रोज रोज कोबी.
आज कोबी , उद्या बटाटा , परवा फ़्लॉवर.
मग mixed veg ( कोबी + बटाटा + फ़्लॉवर)

मेस ला सुट्टी , बाहेर चला.
रविवार संध्याकाळ. बाहेर चला.


रस्त्याशेजारच्या गाडीपासून , फ़ुटपाथावरच्या चिनकाई पासून ते गच्च भरलेल्या पंचमी शुद्ध शाकाहारी पर्यंत.
त्याच भाज्या , तीच रोटी , तेच नूडल्स .
सगळ्या भाज्या सारख्याच दिसतात,
सगळे नूडल्स सारखेच लागतात.

मित्र आहेत. order दिली. दंगा चालु. गर्दी फ़ार.
order आली. serve झाली.

हातातला घास हातातच रहातो. डोळ्यांच्या कडा पाणावतात.
आईच्या हाताची चव जिभेवर अजूनही रेंगाळतेच आहे.

कुणाला दिसण्याआधी,
डोळे कोरडे करून, मोठ्या आवाजात,
मी एक वाक्य टाकतो. हशा पिकतो.

अन्न हे पूर्णब्रम्ह , मनात घोळवत
मी जेवण सुरु करतो.

Monday, February 19, 2007

एक अविस्मरणीय दिवस

१७ फ़ेब्रुवारी २००७. पुढची अनेक वर्षं लक्षात राहील असा हा दिवस आहे. त्याला कारणंही बरीच आहेत. या दिवसानं मला खूप काही दिलं. अपेक्षाभंगाचं दु:ख, दिवसभराची हुरहूर, काही सुखद धक्के,एकटेपणाची भावना,आयुष्यात पहिल्यांदाच लेखिकेच्या स्वाक्ष्ररीसह भेट मिळालेला कथासंग्रह,काही जुन्या प्रश्नांची उत्तरं आणी दत्त म्हणून उभे राहिलेले काही नवे प्रश्न, ईगोची जाणीव... बरंच काही म्हटलं ते यासाठी.

अस्मादिकांचा २३ वा वाढदिवस. रात्रीचे १२ वाजले. यथावकाश दोन मित्रांचे समस आले. छान वाटलं. मग सेल शांतच राहिला. झोपायच्या आधी मी परत परत सेल चेक केला. चालू होता.
सकाळ उजाडली तीच मित्राच्या फ़ोन ने. मग घरच्यांचा फ़ोन. आशिर्वादपूर्ण शुभेच्छा वगॆरे. फ़ोन ठेवल्यावरही कसली तरी हुरहूर जाणवत होती. आधी वाटलं की घरच्यांची आठवण येत असेल. पण लगेचच मी युक्तीवाद केला. "हा काही पहिलाच वाढदिवस नाही घरापासून लांब साजरा केलेला." बरोबर. मग ही बेचॆनी कसली?


अचानक उलगडा झाला. कालपासून डोक्यात कुठेतरी calculations चालू होते. कुणाचा फ़ोन येइल, कोण फ़क्त समस करेल, कोण स्वत: रूमवर आवर्जुन येइल आणी कोण अगदीच ऑर्कुटवर स्क्रॅप टाकेल. आणी दिवस कलायला आला तेव्हा जाणीव झाली की गणीत साफ़ चुकलेलं आहे. मग वाईट वाटलं. रागही आला.

राग? कशाचा? गेल्या वर्षात मी ज्यांचं वाढदिवसादिवशी अभिनंदन केलं होतं त्यांच्याकडून मी फ़सला गेलोय अशी भावना झाली होती. छे ! ही तर देवाणघेवाणीची भाषा. म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्या या दिवशी परत मिळाव्यात हा एवढाच विचार असतो? मला स्वत:चीच लाज वाटली. मग स्वत:वर चिडचिड करण्यात दिवस गेला.


संध्याकाळी मित्र रूमवर आला आणी मग त्याने या सगळ्यामागचं कारण सांगितलं. ऑर्कुटवर मी birth date ला show to self करुन ठेवलं होतं. त्यामुळे मित्रांना वाढदिवस दिसतच नव्हता. मग मित्रांना कळणार कसं?

अरेच्च्या! असा मामला आहे होय! छान. आणी मी मात्र दिवसभर वेगवेगळे निष्कर्ष काढत बसलो होतो. (वाढदिवस असल्याने अर्थातच प्रोजेक्ट वर्क ला दांडी मारली होती.) एकदा वाटलं की आपले इतके कमी मित्र कसे? चार वर्षात फ़क्त हाताच्या बोटावर मोजण्याइतके? मग दिवसेंदिवस , महिनोनमहिने ज्यांच्याशी गप्पा मारण्यात घालवले ते कॊण? की मस्करी करता करता, नक्कल करता करता मी अनेक मित्रांना दुखावून बसलोय जे माझं साधं अभिनंदन करायलाही तयार नाहीत! काय अन काय. डोंगर पोखरून उंदीर निघाला. त्या उंदराइतकाच माझा ईगो किती क्षुद्र आणी तकलादू आहे याची जाणीव झाली. आणि तसं बघायला गेलं तर माझ्या बर्याच मित्रांचे वाढदिवस मला तरी कुठं लक्षात आहेत? कोणीतरी सांगतं,रिमाईंडर वाजतो म्हणून ऎटीत फ़ोन करणं आणि विश करणं चालू आहे. मग आज ज्यांना वाढदिवसाची कल्पनाच नाही आहे त्यांना मित्र न समजणं हा किती मूर्खपणा!

हायसं वाटलं. मनावरचं दडपण कमी झालं. अपराधीपणाची भावनाही जरा बोथट झाली. मग विचार केला की अरे कुणीही न सांगताही ज्या मित्रांचे फ़ोन आले त्यांची मॆत्री लाभली ही भाग्याची गोष्ट नाही का? मित्र या गोष्टीचं माझ्या आयुष्यातलं स्थान नव्यानं उमगलं. मित्रांशिवायच्या आयुष्याची झलकही बघितली. हा वाढदिवस स्वत:ला ऒळखण्यात गेला.

अर्थात सगळंच काही इतकं उदास नव्हतं काही. माझ्या एका मित्राचे आईवडिल दोघेही साहित्यिक आहेत. त्याच्या आईने त्यांनी लिहिलेला कथासंग्रह स्वत:च्या हस्ताक्षरात मला भेट दिला. खुद्द लेखिकेकडून सप्रेम भेट. मी हवेत होतो. लहानपणापासूनची ही इच्छा पूर्ण झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वाढदिवसादिवशी मी ख्रर्या अर्थानं मोठा झालो. आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हा व्यवहार नाही आहे याची स्वत:ला खात्री पटवेन.


१७ फ़ेब्रुवारी २००७. मी कधीच विसरणार नाही. :)

Thursday, February 15, 2007

काही विचार ..... भरकटलेले

रेडिओवर दुपारी एक बालगीत लागलं होतं. बोल असे होते..

रोज रोज तेच नको रोज रोज तेच
डाव इतका सोपा नको हवा थोडा पेच
पाऊस येताच छ्त्री घ्या थंडी वाजता बंडी
का कुणी म्हणत नाही जाउन गारा वेच?

गंमत आहे. लहानपणी पावसात भिजायची इच्छा असायची तर परवानगी नसायची. आजकाल परवानगी ची गरज नाही भासत. पण .. गेल्या कित्येक वर्षात मनासारखा पाउसच पडलेला नाही. जसा मोठा झालोय, सगळा रखरखाटच जाणवतोय.

कपडे ओले होण्याचं, आजारी पडण्याचं टेन्शन नाही. वरुन ढगफ़ुटी झाल्यासारखं पाणी कोसळतंय, डांबरी रस्त्यावर आणि कोल्हापूरच्या characteristic खड्ड्यांमधे उड्या मारत पाणी अंगावर घेतोय. सोबतीला मातीचा वास आहेच! मित्राच्या घराच्या टेरेसवर जमा होणारं पाणी एकमेकांच्या अंगावर उडवतोय. पायात चप्पल, बूट काहीही नाही, अनवाणी पायांनी या देवाघरच्या देण्याचं स्पर्शसुख अनुभवतोय. आई टॉवेल घेउन दारातून हाका मारतेय. चहा तिने टाकला असेलच आणि भिजून, चिखलात नाचून घरात गेलं की परत एक आंघोळ ठरलेलीच. मग गरमगरम चहा. दूरदर्शनवरचे कार्यक्रम बघत बघत तो चहा प्यायचा. त्या दिवशी त्या चहाला पण पाउस "चढलेला" असतो. तोही नवानवा, ताजा आणी उबदार लागतो.

आठवणीतला, मनातला पाउस हा असा आहे.
जशा यत्ता चढत गेलो तसा हा पाउस दिसेनासा झाला. मग राहिलं ते कुठ्ल्यातरी अनोळखी पावसात, भर पहाटे दप्तर ओलं होणार नाही याची काळजी घेत गारठलेल्या हातांनी ब्रेक दाबत, अंधारात सायकल हाणत क्लासला जाणं.
आताशा तर पावसात सकाळी उठायचीही गरज पडत नाही. पण अनोळखी शहरातला पाउसही अनोळखी. इथे आणि आजकाल तर पावसात लहान मुलं पण जर्किन आणी रेनकोट घालून समजूतदारपणे शाळेला जात असतात. मी संधी शोधत असतो भिजायची. पण व्यर्थ. कपडे भिजण्याव्यतिरिक्त काहीच होत नाही. चहा, सिगारेट आणि कांदाभजी म्हणजे पाउस enjoy करणे अशी संकल्पना असणार्या मित्रांना समजवणार तरी कसं?

मग बाकी काहीच जमलं नाही तर शांतपणे "गारवा" लावायची.

पाउस म्हणजे चिखल सारा , पाउस म्हणजे मरगळ
पाउस म्हणजे गार वारा , पाउस म्हणजे हिरवळ

सौमित्रचे हे शब्द ऎकले की कोणीतरी समदु:खी सापडल्याचा आनंद होतो.
पेपरमध्ये "आषाढस्य प्रथमदिवसे" अशा मथळ्याने पावसाचा फ़ोटो छापून आलेला असतो आणी मी पुढच्या वर्षी हा पाउस शोधायचाच असा निश्चय करुन जर्किन चढवून बाहेर पडतो.

पुणे तेथे काय उणे???

पुण्यात शिकायला येण्याआधी माझ्या पुण्याबद्द्लच्या आणि पुणेकरांबद्द्लच्या काही कल्पना होत्या. अर्थातच त्यातल्या बर्र्याचशा कल्पनांना पुणेकरांनी त्यांच्या स्वभावधर्माला जागून सुरुंग लावला.
या प्रक्रियेची काही मासलेवाईक उदाहरणे खालीलप्रमाणॆ.


संकल्पना नं. १) पुण्यातल्या सगळ्या मराठी मुलांना साहित्याची चांगली जाण असते.

एका मित्राच्या आयुष्यात घडलेला हा किस्सा. हा मित्र पुण्यनगरीत रहातो. या महाशयांचे वडिल प्रकाशनाच्या व्यवसायात असल्याने त्यांच्या घरी बय्राचदा लेखक आणी कविंचे फ़ोन येत असतात. पण याला मात्र विंग्रजी साहित्याची आणी संगिताची जास्त आवड आहे.


असाच एका दिवशी फ़ोन
वाजला. कधी नव्हे ते या महाशयांनी उचलला.

"हॆलो".
"हॆलो, ******(मित्राच्या वडिलांच नाव) आहेत का?"
"कोण बोलतंय?"
"देशपांडे".
"कोण देशपांडे?"
"सुनिता देशपांडे."
"कोण सुनिता देशपांडे?"
तिकडून शांतता. कधीतरी चकक पुण्यात आपल्याला असाही प्रश्न विचारला जाईल असं त्यांच्या स्वप्नातही आलं नसेल.

"पु. ल. देशपांडेंची पत्नी."

मग इकडून शांतता. आपल्या गाढवपणाची व्याप्ती कळताच त्याने आरोळी ठोकली.

"बाबा... फ़ोन."


संकल्पना नं. २) ओळख असल्याशिवाय पुणेकर घरात घेत नाहीत

एका मित्राचं घर शोधत फ़िरत होतो. त्याच्या वडिलांकडून एक पुस्तक घ्यायचं होतं. बिल्डिंगचं नाव माहिती होतं आणि दारावर कुणाच्या नावाची पाटी आहे तेही माहिती होतं. पण flat number माहिती नव्हता. नावाच्या पाटीवरुन घर आरामात शोधू अशा (गॆर)समजुतीने मी बिल्डिंगचं गेट उघडलं.

1st floor ला गेल्यावर एका flat चं दार उघडं दिसलं. पाटी तीच होती. आत सोफ़्यावर एक आजोबा बसले होते. त्यांनी सुहास्य मुद्रेनं स्वागत केलं. मला वाटलं की असतील मित्राचे कुणीतरी काका किंवा आजोबा वगैरे. मग मीही आत सोफ़्यावर जाउन बसलो. समोर २-३ आज्या बसलेल्या होत्या. म्हणलं आता मित्राचे वडिल येतील बाहेर. मी निवांत. आज्ज्या माझ्याकडे टक लावून बघत होत्या.

काही क्षण तसेच गेले. मग आजोबांनी हसत हसत डायलॉग टाकला.

"काय आज ईकडे कुणीकडे?"

मनातल्या मनात पु.लं. ना नमस्कार करुन मी प्रश्न केला.
"काका दिसत नाहीत?"
"ते वरच्या मजल्यावर असतील."

तात्काळ मी तिथून काढता पाय घेतला. वरच्या मजल्यावर गेलो. परत दारावर तेच आडनाव. मी परत बेल वाजवली. या वेळी दार उघडल्यावर मी विचारलं

"ते हे **** कुठे रहातात?"
"वरच्या मजल्यावर."

परत एक मजला. परत दारावर तेच नाव. मात्र या वेळी मित्राचे वडिल दारातच उभे होते. माझ्या जिवात जीव आला. नंतर जेव्हा ते मला खाली सोडायला आले तेव्हा "ईकडे कुणीकडे?" वाले आजोबा दारातून आमच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत होते.
नशीब रविवार संध्याकाळची वेळ होती. नाहीतर सकाळी गेलो असतो तर आजोबांनी चितळेची बाकरवडी आणी हिंदुस्तान बेकरीचं प्याटीस खाउ घातल्याशिवाय सोडलं नसतं.


संकल्पना नं. ३) पुण्यातली माणसं त्यांच्या वयाला शोभेलशी वागतात........


काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण नाट्यग्रुहात शास्त्रीय संगिताच्या (गाण्याच्या) कार्यक्रमाला गेलो होतो. आम्ही तिघे मित्र सोडलो तर बाकी जवळपास सगळं पब्लिक कोथरूड मधलं. त्यातही मध्यमवयीन आणि पेन्शनर जास्त.

आमच्या मागे दोन टिपिकल पुणेरी ज्येष्ठ नागरिक (थेरडे) बसलेले होते. पडदा उघडताच त्यांची live commentry चालू झाली.

"आयला मंग्या आला बघ." (कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकांचा प्रेमळ एकेरी उद्धार)
"या मंग्याला कशाला बोलावतात कुणास ठाउक!".

इकडे रिवाजाप्रमाणे आयोजकांचं नाव, गायिकेची ऒळख अशी बड्बड चालू होती संयोजकांची.
"ए गपे! आयला गाणं ऎकायला आलोय. तुझी बडबड नाही."

आता संयोजक शास्त्रिय संगीत कसं महान आहे हे पटवून द्यायच्या मागे लागले होते.
"हा , माहिती आहे. लयी शहाणा आहेस."
"हा मंग्या फ़ार शहाणपणा गाजवायला जातो. "

त्यानंतर गाणं सुरु झालं. एक राग गाउन झाल्यानंतर मध्यंतराची घोषणा करायला परत "मंग्या" स्टेजवर आला.

"च्यायला हा मंग्या विचका करतो कार्यक्रमाचा".

इकडे आम्ही प्रौढांसारखे शांतपणे गाणं ऎकत होतो आणी हे दोघे शाळकरी पोरांसारखे निवेदकाची टर उडवत होते.
स्टेजवरुन एक भाषाश्रीमंती दर्शवणारं पल्लेदार वाक्य आलं.
इकडे मागे,

"तुझ्या नानाची टांग"


एवढा वेळ धरलेला संयम सुटला आणी आम्ही खदाखदा हसत सुटलो.


पुण्यातल्या म्हातार्यांना खरंच तोड नाही!!!!