रोजच्या सवयीने त्याला जाग आली. घड्याळात पाहिलं. पहाटेचे साडे पाच वाजले होते. कूस वळवून बघण्याची गरज त्याला भासली नाही. तिची उब, तिचा वास तिच्या अस्तित्त्वाची साक्ष देत होते.
तो सावकाश उठला. बेसीनपाशी गेला. कुठल्याशा पांढर्या मंजनाने दात घासले. चूळ भरली. तोंड धुवून स्वयंपाकघरात आला. गॅसवर भांडं ठेवलं. पाणी ओतलं.
पाणी. स्वच्छ, थोडंसं गोडसर, रंगरहित पाणी. त्याच्या लहानपणासारखं. त्याला आठवलं बालपण. नोकरदार वडिल, प्रेमळ आई, मध्यमवर्गीय घर. मध्यमवर्गीयच स्वप्नं, आशा, आकांक्षा....
’साखरेचा डबा कुठं गेला बरं?’ तो स्वत:शीच पुटपुटला. बरीच शोधाशोध केल्यावर सापडला.
आजकाल असंच होतं. साध्या साध्या गोष्टींत स्मरणशक्ती दगा देऊ लागली आहे. पण पूर्वीचं सारं मात्र लख्ख आठवतंय.
डबा उघडून त्याने पाण्यात साखर टाकली. बघता बघता ती पाण्यात विरघळून गेली. शुभ्र, गोड, अर्धपारदर्शक. जणू पहिल्या भेटीतली ती. तीही अशीच आली आणि विरघळून गेला तो तिच्यात. पूर्वी कधी अनुभवला होता असा नात्यातला गोडवा? जग इतकं सुंदर आहे हे त्याआधी कुणी त्याला सांगूनही खरं वाटलं नव्हतं.
उकळत्या पाण्याच्या आवाजाने तो भानावर आला. गडबडीने त्याने चहा पावडरीचा डबा उघडला. त्या काळ्याकुट्ट, सुकलेल्या पानांकडे बघितलं की कसंसच व्हायचं त्याला. ती काळी रात्र आठवायची. तिच्या जाण्याची रात्र. कितीक प्रयत्न करूनही विसरली न जाणारी रात्र. नंतरच्या अगणित रात्री जागवत ठेवणारी रात्र.
ते नकोसे विचार आणि त्या आठवणी झटकत त्याने दोन चमचे पावडर पाण्यात टाकली. पाणी काळवंडलं. हळू हळू लाल होत गेलं. काळसर लाल, तामसी लाल, मॉरडॉरच्या त्या ज्वालामुखीच्या रंगाचं लाल.
कितीक वर्षं तो त्रास भोगला होता, जगला होता. ’ती नाही तर कुणीच नाही’ या हट्टाला सारं आयुष्य वाहून टाकलं होतं. बरोबरीचे सारे लेकुरवाळे झाले. तो तसाच राहिला. आतल्या आत आक्रोशत, जळत. वेळ पुढे जात नव्हता त्याच्यासाठी. त्या रात्री ती कालचक्रच जणू थांबवून निघून गेली होती.
पाणी उकळत चाललं होतं. संताप आणि वेदनेच्या लालजर्द उकळ्या फ़ुटत होत्या त्याला.
"अहो लक्ष कुठंय तुमचं? उकळला की चहा", अचानक कानावर पडलेल्या आवाजाने तो भानावर आला.
समोर पाहतो तर काय, त्या उकळत्या पाण्यात ती थंडगार, दाटसर दूध घालत होती. जसं जसं ते दूध त्या चहाला भेटत गेलं, त्या उकळ्या थांबल्या. चहाचा रंग पालटला. मघाच्या तामसी लालपणाची जागा आता वयाने येण्यार्या स्निग्धतेच्या आणि सामंजस्याच्या केशरी पांढर्या रंगाने घेतली होती.
"उकळत्या चहाच्या पाण्यात दूध घातल्याशिवाय चहाला बिलकूल चव येत नाही". ती स्वगत बोलल्यासारखी पुटपुटली.
’खरंय तुझं प्रिये. तू गेलीच नसतीस आयुष्यातून तर गृहित धरलं असतं मी तुला. विसरून गेलो असतो कालांतराने तुझं माझ्या आयुष्यातलं महत्त्व. तू गेलीस आणि मग बर्याच वर्षांनी मी तडफ़डून मरेन असं वाटत असताना परत आलीस. मी नाही विचारलं, इतकी वर्षं कुठे होतीस ते. तुझ्या मायेसाठी असुसलेल्या मला काय पडली होती तुझ्या मधल्या वर्षांची? उकळत्या पाण्याने थंड दुधाला उराउरी भेटावं. तरच त्याचा दाह शमतो. त्याच्या अस्तित्त्वाला अर्थ येतो. दुधाच्या उशीरा येण्याचा जाब विचारायचा ना त्याला हक्क असावा ना असावी इच्छा’
"चहा घेताय ना?", तिने सुरकुतल्या हातांनी त्याला बशी दिली. त्याने थरथरत ती ओठाला लावली. पहिला घोट घेतला. क्षणिक मिटलेले डोळे उघडले.
खिडकीतून येणार्या पहिल्या सूर्यकिरणांनी तिचा चेहरा उजळला होता. तिचे पांढरे केस त्या सौंदर्यात अजूनच भर घालत होते. बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. या सगळ्याचा अर्थ लावता लावता अखेर ती जाणिव त्याला येऊन भिडली.
जग पुन्हा सुंदर झालं होतं....